आंबोली घाट मार्ग बनला धोकादायक

0

आंबोली : गेले काही दिवस जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुरग्रस्त स्थिती असून आंबोली घाट मार्ग ही अतिशय धोकादायक बनला आहे. मंगळवारी ( ता. ६ ) आंबोलीपासून तीन किमीवर घाटमार्गात मुख्य धबधबा अलिकडेच मोठी दरड दोन वेळा कोसळली. यात सुदैवाने आंबोली पोलिस कर्मचारी बालबाल बचावले होते. तर त्याच दिवशी याच घाटमार्गात वेगवेगळ्या आठ ठिकाणी मोठी झाडे, दगड व माती कोसळली होती. यामुळे संपूर्ण घाट मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. तरीही यंदाच्या या पावसाळ्यात ठिकठिकाणी दरडीतील भले मोठे दगड, माती व सर्वत्र झाडे कोसळण्याच्या स्थितीत आले असून ते कधीही कोसळू शकतात. यामुळेच जीव मुठीत धरून वाहन चालक व प्रवासी प्रवास करत आहे. तर बुधवारी ( ता. ७ ) रात्री मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर पुन्हा दरड कोसळल्याने आंबोली घाट मार्ग ठप्प झाला आहे. तसेच पाऊस असाच राहिल्यास संपूर्ण आंबोली घाटात ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या स्थितीत आहे. संबंधित प्रशासनाने तज्ज्ञाच्या मदतीने घाट मार्गाची पाहणी करून नंतरच वाहतुकीवर निर्णय घ्यावा. अतिवृष्टीमुळे गेले काही दिवस आंबोली व परिसरातील ही जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेले दहा दिवस वीज नसून सर्वच मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. दोन दिवसापूर्वी मंगळवारी ( ता. ०६ ) सकाळी मुसळधार पावसामुळे घाटमार्गात ठिकठिकाणी झाडे व दरड कोसळली होती. याचवेळी देवगड डेपोची देवगड-बेळगाव एसटी बस ही बचावली होती. त्याचदरम्यान त्याठिकाणी आंबोली पोलिस कर्मचारी गवस व कुंभार पाहणीसाठी गेले होते. मात्र, ते माघारी आंबोलीच्या दिशेने येताना अचानक दरड कोसळली. आणि याच दरडीच्या मातीत पोलिसांची चारचाकी जीप अडकली. यामध्ये चारचाकी जीपमधील पोलिस कर्मचारी गवस व कुंभार सुदैवाने बचावले होते. आंबोली घाटात ठिकठिकाणी दरडीतील दगड, मातीचे कडे व झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. कड्यावरून कोसळणारे धबधब्यांचे पाणी यांचीही दिशा बदलली आहे. मुख्य रस्त्यावरील काही पाण्याच्या मोऱ्या बंद असून खचलेल्या आहेत. तसेच आंबोली घाटातील ४० फुटांच्या मोरीपासून घाटमार्गात ठिकठिकाणी मोठमोठ्या दरड कोसळण्याच्या स्थितीत आहेत.  माती, दगड व झाडे रस्त्यावर येत आहेत. यामुळे या पावसात अचानक काही दुर्घटना घडल्यास जीवितहानी नाकारता येत नाही. सद्या वाहतुकीस घाटमार्ग धोकादायक झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन शक्य त्या उपाययोजना तत्काळ करावेत, अशी मागणी वाहन चालक, प्रवासी, आंबोली-चौकुळ ग्रामस्थ करत आहेत. आंबोली घाटमार्ग बंद असल्याने सिंधुदुर्ग, गोव्यासह पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक यांचा संपर्क तुटला आहे.  आवश्यक असलेल्या वस्तूंचा तुटवडा झाला आहे. सर्वत्र पुरस्थिती झाल्याने त्यामध्ये आंबोली घाटमार्ग बंद झाला आहे. यामुळे व्यावसायिकांचे लाखोचे नुकसान होताना दिसत आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here