दापोलीत सायकल फेरीने लुटला दिवाळीतील किल्ले पाहण्याचा आनंद

0

दापोली : दिवाळीच्या निमित्ताने साकारलेले किल्ले पाहण्यासाठी रविवारी दापोली सायकलिंग क्लबने सायकल फेरी काढली. त्यातून अनेकांनी किल्ले पाहण्याचा आनंद लुटला.

महाराष्ट्रातील गड, किल्ल्यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा, याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. दापोलीमध्येही चिमुकल्यांसह तरुणांनी विविध किल्ले साकारले आहेत. ते पाहण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबने सायकल फेरी काढली. आझाद मैदानातून सुरू झालेली सायकल फेरी केळस्कर नाका मार्गे पुन्हा आझाद मैदान या १० किमीच्या मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. फेरीच्या मार्गावरील किल्ल्यांना भेट देऊन ते बनवणाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

दिवाळीमध्ये दगड-मातीपासून किल्ले बनवण्याची मजा काही वेगळीच असते. सुराज्य मित्र मंडळाने साकारलेला भव्य प्रतापगड, प्रभुआळीतील कदम, ध्रुव किरडावकर व मित्रांनी बनवलेला लोहगड, लालबाग येथील राळे, पाटील यांचा भव्य राजगड, आग्रे, गोवले यांचे किल्ले, पांगारवाडीमधील शिगवण, कदम, आनंदनगरमधील गावडे, लष्करवाडीमधील जाधव, सम्यक पाते यांच्याकडील जंजिरा किल्ला पाहण्यासारखा आहे. तसेच या मार्गावर इतर अनेक किल्ले उत्तम रीतीने सजवलेले आहेत. सर्वांनी हे किल्ले बनवण्यासाठी वापरलेले साहित्य, सजावट इत्यादींबद्दल जाणून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here