एकता दिनानिमित्त सरदार पटेल यांच्याविषयीच्या ग्रंथांचे प्रदर्शन

0

रत्नागिरी : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकता साजरा करतानाच त्यांच्याशी संबंधित ग्रंथांचे प्रदर्शन भरवून येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाने वेगळेपण जपले.

सरदार पटेल यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात पोलादी पुरुष म्हणून अत्यंत आदराने गौरविले गेले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यपूर्ण होते. चाणक्याची मुत्सद्दी नीती त्यांच्याजवळ होती. आपल्या कामावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य होते. ते खंबीर प्रशासक होते. कणखर धोरणांचा अवलंब करून ५६५ संस्थानांचे विलीनीकरण करून त्यांनी एकसंध भारत उभा केला. त्यांची १४७वी जयंती आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देशभर साजरी होत आहे. या दिवसाचे औचित्य साधून सरदार पटेल यांच्या जीवनावरील आणि राज्यशास्त्र विषयाच्या निवडक ग्रंथांचे प्रदर्शन ग्रंथालयात भरविण्यात आले.

महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यामाने हे प्रदर्शन भरविण्यात आले. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या राष्ट्रीय एकतेला खूप महत्त्व दिले. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती पाहून महात्मा गांधी यांनी त्यांना लोहपुरुष अशी उपाधी दिली होती. ते भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. देशप्रेम, त्यासाठी त्यांची प्रचंड उर्जा, सतत कार्य करण्याची वृत्ती, कणखरपणा यासाठी देश त्यांना सदैव स्मरणात ठेवेल. विद्यार्थ्यांनी त्यांचे हे गुण स्मरणात ठेऊन ते अंगीकारले पाहिजेत. आपल्या राष्ट्राविषयी निष्ठा असणे यासाठी एकत्र राहणे ही आज काळाची गरज आहे. याकरिता सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने आयोजित केलेले ग्रंथ प्रदर्शन प्रेरणादायी ठरेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 01/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here