रत्नागिरी : चिपळूण येथील पेठमाप भागात राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. अज्ञातांनी तिच्या अंगावर ॲसिड टाकून चेहऱ्यावर वार करत खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. मृत महिला घरामध्ये एकटी असतानाच अज्ञातांनी तिचा खून केल्याची शक्यता आहे.
सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे गेला असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे. कुलसूम अन्सारी अस मृत महिलेचे नाव असून चिपळूण पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून श्वान पथकला पाचरण करण्यात आले आहे.
दरम्यान मृत महिलेचा मुलगा रत्नागिरी येथे गेला होता, तो आपल्या आईला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची आई फोन उचलत नव्हती. त्यावेळी मुलाने आपल्या मित्रांना घरी जाण्यासाठी सांगितले. ज्यावेळी मित्र घरी पोहोचले त्यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी घरात कुलसूम अन्सारी यांचा मृतदेह एका बाजूला अंगावर चादर टाकून झाकून ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. सोमवारी सकाळी या महिलेचा दफनविधी पोफळी सय्यदवाडी येथील कब्रस्थानात करण्यात आला. दरम्यान या महिलेचा खून हा चोरीच्या प्रयत्नात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी पोलीस वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 02/Nov/2022
