नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे देशातील अनेक भागातील मजूर, विद्यार्थी अडकले आहेत. मात्र आता अशा स्थलांतरित मजूरांना, विद्यार्थ्यांना आपापल्या गावी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यातील अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिकारी नेमण्याची अधिसूचना जारी केली आहे. नोडल अधिकारी संबंधित जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांची नावं दाखल करतील आणि ही यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल. अडकलेल्या लोकांना नोडल प्राधिकरणाने दिलेल्या पत्राची प्रत आपल्याकडे ठेवावी लागेल. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल, तरच संबंधित नागरिकांना स्थलांतर करता येईल. स्वत:च्या आवारात पोहोचल्यानंतर अशा व्यक्तींची तिथल्या स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तपासणी करावी. चाचणीनंतर कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत, तर अशा व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात यावं. कोरोनाची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी बसेसचा वापर होणार असून या वाहनांमध्ये सॅनिटायझेशन करणं आवश्यक असणार आहे. गाडीमध्ये बसताना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करावं लागेल. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व नियमाचं पालन करणं गरजेचं आहे.
