कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

0

मुंबई : कार्तिकी एकादशी निमित्त करण्यात येणारी श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा हस्ते आज पहाटे संपन्न झाली.

वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या पूजेत उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत सहभागी होण्याचा मान यावेळी संभाजीनगरचे वारकरी दांपत्य उत्तमराव माधवराव साळुंखे व कलावती उत्तमराव साळुंखे ( रा. मु.पो. शिरोडी खुर्द, तालुका- फुलंब्री ) यांना मिळाला. साळुंखे हे समाज कल्याण खात्याचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ते गेली 50 वर्षांपासून पंढरपूरची वारी करतात.

मी अतिशय समाधान आहे की, आज मला विठूमाऊलीची पुजा करण्याची संधी मिळाली. हा अतिशय भाग्याचा योग असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विठ्ठल हा सामान्य माणसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत, त्यांच जीवन सुजलाम सुफलाम व्हावं, यासाठी कार्य करण्याची शक्ती आम्हाला मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही नेहमीच विठ्ठलाला करत असतो असे फडणवीस म्हणाले. ही पुजा मनाला शांती देणारी असल्याचेही ते म्हणाले.

विकास करताना पंढरपूरची कोणतीही परंपरा खंडीत होणार नाही
मंदिर परिसरात कॉरीडॉर तयार करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत मी काल बैठक घेतली आहे. विकासकामं करत असताना पंढरपूरची कोणतीही परंपरा खंडीत होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. कोणालाही विस्थापीत करणार नाही. मात्र, काही जागा घ्यावा लागतील, त्या जागा घेत असताना त्यांना योग्य त्या प्रकारचे पुनर्वसन करण्याची, त्यांचा व्यवसाय योग्य चालला पाहिजे यासंबंधीची काळजी घेतली पाहिजे असे फडणवीस म्हणाले. अतिशय चांगला कॉरीडॉर तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कॉरीडॉरचे काम करायला जरी वेळ असला तरी मंदिराचे काम करायला आम्ही तत्काळ करायला सुरुवात करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

आम्ही विस्थापीतांना प्रस्थापीत करणारी माणसं
महाराष्ट्रात शिंदे साहेबांचे आणि आमचं सरकार आहे. आम्ही मोदीसाहेबांच्या नेतृत्वात कामं करतो. त्यामुळं आम्ही कोणाला विस्थापीत करत नाही. विस्थापीतांना प्रस्थापीत करणारी माणसं आम्ही असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर संत नामदेव महाराजांनी अवघ्या विश्वाला दिलेल्या समता, बंधुता या संदेशाला उजाळा देण्यासाठी पंढरपूर ते घुमान निघालेल्या सायकल वारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. 75 वर्षाच्या भावे आज्जी देखील या सायकल वारीत सहभागी होणार आहेत. त्या 2 हजार 300 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही सायकल वारी महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील स्नेह वाढवणारा ठरेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आज पहाटे या सायकल वारीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी झेंडा दाखवल्यावर सुरुवात झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 04/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here