मुंबई : ‘विद्यापीठ, महाविद्यालय परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महाविद्यालयीन, विद्यापीठाचे नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करावे अशी शिफारस करण्यात आली आहे. आयोगाच्या प्राप्त सूचनांच्या अधीन राहून राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून, येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल’, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत म्हणाले, ‘पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा या १ जुलै ते १५ जुलै २०२० दरम्यान घेण्यात याव्यात तसेच बारावी नंतरचे प्रवेश लवकरात लवकर देऊन १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करावी, असा सूचना आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्ष याचे वेळापत्रक तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसोबत लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांवर सविस्तरपणे चर्चा करून राज्यातील परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष याचा अहवाल तयार करण्यात येईल त्यानंतर सर्व कुलगुरूंशी चर्चा करून अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर राज्यातील करोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यांच्या सोबत परीक्षापद्धती आणि शैक्षणिक वर्षयाबाबत चर्चा करून लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.’
