ऑस्ट्रेलियन संघाकडून टीम इंडियाला दणका

कोरोना व्हायरसच्या संकटात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून टीम इंडियाला हा धक्का बसला आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा झालेल्या नाही. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडियानं अव्वल स्थान पटकावले आहे. तरीही भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. 2016नंतर भारताला कसोटीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. ऑस्ट्रेलियन संघानं हे अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसीनं शुक्रवारी कसोटी, ट्वेंटी-20 आणि वन डे क्रिकेटमधील संघांची क्रमवारी जाहीर केली. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 116 गुण जमा झाले असून न्यूझीलंड ( 115) आणि भारत ( 114) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. मे 2019नंतर खेळलेल्या सामन्यांतून 100 टक्के आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षांतील कामगिरीच्या 50 टक्के गुणांची बेरीज करून ही क्रमवारी ठरवण्यात आली. भारतीय संघ ऑक्टोबर 2016पासून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. 8 गुणांच्या घसरणीसह ते सहाव्या स्थानावर गेले आहेत. श्रीलंका पाचव्या स्थानावर आली आहे. ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्येही अव्वल स्थान पटकावले आहे, तर इंग्लंड संघ वन डेच्या अव्वल स्थानावर कायम आहे. वन डे क्रमवारीत इंग्लंड 127 गुणांसह टॉपवर आहे. भारतीय संघ 8 गुणांच्या फरकानं दुसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड 116 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघानं 27 महिन्यानंतर ट्वेंटी-20 क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले आहे. ऑस्ट्रेलियानं 278 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. 2011नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. इंग्लंड ( 268) आणि भारत ( 266) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान 260 गुणांसह आता चौथ्या स्थानावर गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here