वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन खेळाडू

आज, १ मे महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने या लेखात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ६ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आढावा घेण्यात आलेला आहे.

HTML tutorial

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन खेळाडू

६. अजिंक्य रहाणे –

मुळचा संगमनेर तालुक्याचा असणारा आणि मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा अजिंक्य रहाणेने भारताकडून इंग्लंड विरुद्ध मँचेस्टर येथे ऑगस्ट २०११ ला टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर त्याचे लगेचच सप्टेंबर २०११ ला इंग्लंडविरुद्धच वनडे पदार्पणही झाले.

तेव्हापासून रहाणेने ९० वनडे सामने खेळले असून यात ३५.२६ च्या सरासरीने २९६२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतकांचा आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. पण सध्या रहाणे भारताच्या वनडे संघातून मागील काही वर्षापासून दूर आहे. तो शेवटचा वनडे सामना फेब्रुवारी २०१८ ला खेळला आहे.

५. सुनिल गावसकर –

लिटिल मास्टर सुनील गावसकरांनी आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी वनडेतही त्यांची छाप सोडली. गावसकरांनी जूलै १९७४ ला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ते १०८ वनडे सामने खेळले. त्यांनी वनडेमध्ये ३५.१३ च्या सरासरीने ३०९२ धावा केल्या. यात त्यांच्या १ शतकाचा आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. गावसकर त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना नोव्हेंबर १९८७ ला खेळले.

४. रवी शास्त्री –

भारताचे दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी जवळजवळ सर्व क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यांचा १९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय संघातही समावेश होता. त्यांनी नोव्हेंबर १९८१ ला वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथील सामन्यातून पदार्पण केले.

त्यानंतर त्यांनी १५० वनडे सामने खेळताना २९.०४ च्या सरासरीने ३१०८ धावा केल्या आहेत. यात त्यांच्या ४ शतकांचा १८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी १२९ विकेट्सही घेतल्या आहेत. शास्त्री यांनी शेवटचा वनडे सामना १९९२ ला खेळला.

३. दिलीप वेंगसरकर –

भारताकडून बरीच वर्ष तिसऱ्या क्रमांकवर खेळताना दमदार कामगिरीने दिलीप वेंगसरकरांनी आपली वेगळी ओळख भारतीय क्रिकेटमध्ये निर्माण केली. त्यांनी १९ व्या वर्षी १९७६ ला वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या वनडे कारकिर्दीत १२९ सामने खेळताना ३४.७३ च्या सरासरीने ३५०८ धावा केल्या आहेत. त्यांनी यामध्ये १ शतक आणि २३ अर्धशतके केली आहेत.

२. रोहित शर्मा –

भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही वर्षात अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. तो वनडेमध्ये ३ द्विशतके करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. तसेच त्याने श्रीलंकेविरुद्ध केलेली २६४ धावांची खेळी ही वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे. त्याने २००७ ला आयर्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्याने आत्तापर्यंत २२४ वनडे सामन्यात ४९.२७ च्या सरासरीने ९११५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २९ शतकांचा आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. तो वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

१. सचिन तेंडुलकर –

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने १९८९ ला पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत ४६३ वनडे सामन्यात खेळताना ४४.८३ च्या सरासरीने तब्बल १८,४२६ धावा केल्या. यात सर्वाधिक ४९ शतके आणि ९६ अर्धशतके त्याने केली आहेत.

तसेच वनडेतील पहिले द्विशतकही सचिनने द. आफ्रिकेविरुद्ध २०१० मध्ये केले. तो वनडेत सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here