महाराष्ट्रात लवकरच हायड्रोजन पॉलिसी जाहीर करणार : उद्योगमंत्री उदय सामंत

0

रत्नागिरी : अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर गुरूवारी रात्री झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात हायड्रोजन पॉलिसी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही पॉलिसी राबविल्यास हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, स्कूटर्स एवढेच नव्हे तर सागरी मार्गावरील बोटीही तयार होतील. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. येत्या ८ – १५ दिवसांत ही हायड्रोजन पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. यासाठी एक टीम थोड्याच दिवसांत रत्नागिरीत येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण एच. पुजार उपस्थित होते.
ड्रायड्रोजन पॉलिसीसंदर्भात माहिती देताना मंत्री सामंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल हायड्रोजन मिशन चालविण्याचा निर्णय घेतला असून, त्याला महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच प्रतिसाद दिला आहे. इलेक्ट्रिकल वाहनांप्रमाणेच आता हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, स्कूटर्स तयार होतील. यासाठी अमेरिकेशी चर्चा करून करार केला जाणार आहे. येत्या आठ – पंधरा दिवसांत हायड्रोजन पाॅलिसी जाहीर करण्यात येणार आहे.

जपानमधील सुमिटोमो या कंपनीचे मुंबईत लवकरच कार्यालय उभारण्यात येणार आहे. कार्यालय बांधल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून परदेशातील माेठमोठे उद्योग महाराष्ट्रात येण्यास सुरूवात होईल. याचा जिल्ह्यालाही मोठा फायदा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले, या कंपनीने २०११ कोटी रुपयांची जमीन कार्यालयासाठी मागितली होती. मात्र, अडीच वर्षात या कंपनीला एक इंचही जागा मिळाली नाही. मात्र, ही बाब खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना कळताच त्यांनी दहा दिवसांत एमएमआरडीएच्या माध्यमातून २,०६५ कोटी रुपयांची ११,८८७ चाैरस फूट जागा ८० वर्षांसाठी जपानच्या कंपनीला देण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे या कंपनीने मुंबईत हे कार्यालय बांधल्यानंतर दीड हजार लोकांना थेट रोजगार मिळणार असून, ४ ते ७ हजार लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:14 PM 05/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here