कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. अशामध्ये क्रिकेटपटू आपापल्या घरात वेळ घालवत आहेत. याशिवाय काही खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि केएल राहुलबरोबरच इतर खेळाडूही इंस्टाग्राममार्फत चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यादरम्यान रोहित शर्मा , स्म्रीती मंधाना आणि जेमिमाह रोड्रिगेजनेही लाईव्ह चॅटचा आनंद लूटला. यावेळी मंधानाने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीबद्दल खुलासा केला. मंधानाने सांगितले की, “भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शमी जेव्हा रिहॅबिलिटेशनसाठी गेला होता. त्यादरम्यान तो ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने चेंडू टाकत होता. तसेच त्याच्या एका चेंडूमुळे मी जखमी झाले होते. त्याने वचन दिले होते की, तो शरीरावर चेंडू फेकणार नाही.” मंधानाने सांगितले की, “पहिले २ चेंडू मला खेळता आले नाहीत. कारण एवढ्या वेगवान गोलंदाजीवर खेळण्याची मला सवय नाही. पुढे तिसरा चेंडू थेट माझ्या मांडीवर लागला. त्यामुळे मी जखमी झाले.” शमीच्या या वेगवान चेंडूमुळे मंधाना जखमी झाली होती. पुढील १० दिवस तिची मांडी सूजली होती. यानंतर रोहितनेदेखील शमीबद्दल बोलताना सांगितले की, “त्याच्या गोलंदाजीवर खेळणे खूप कठीण आहे. विशेषत: नेट्समध्ये. कारण तिथे त्याचा चेंडू समजणे कठीण असते. हिरवी खेळपट्टी पाहून तो अधिक वेगाने गोलंदाजी करतो. तसेच नेट्समध्ये अधिकतर हिरवी खेळपट्टी असते.” रोहित पुढे म्हणाला की, “बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणेदेखील कठीण आहे. मी २०१३पासून शमीबरोबर खेळतोय. तसेच बुमराहला येऊन ४ वर्षेच झाली आहेत. परंतु नेट्समध्ये सर्वात जास्त फलंदाजाला कोण बीट करते किंवा फलंदाजाच्या हेल्मेटवर कोण जास्त चेंडू मारतय? अशाप्रकारची दोघांमध्ये ही स्पर्धा असते.”
