पुणे : बारामती शहरातील म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय कोरोनाबाग्रस्त रुग्ण आता कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला गुरुवारी ससुन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती शहर सध्या कोरोनामुक्त शहर झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना कोरोनामुक्त बारामतीचे सर्व श्रेय कोरोनाविरोधातील लढ्यात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाला दिले असून लॉकडाउनच्या सर्व नियमांचे बारामतीकरांनी काटेकोरपणे पालन केल्यामुळेच हे शक्य झाल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. त्याचबरोबर महाराष्ट्रही अशाचप्रकारे लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूण आठ कोरोनाग्रस्त रुग्ण बारामती शहर व तालुक्यात मिळून आढळले होते. त्यापैकी समर्थ नगर येथील एक आणि माळेगाव येथील एक अशा एकूण दोन रुग्णाचा मृत्यू झाला. तर, कोरोनाची लागण झालेला पहिला रिक्षाचालक रुग्ण १६ एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला. त्यानंतर २३ एप्रिल रोजी समर्थ नगर येथील एकाच कुटुंबातील चौघेजण कोरोना मुक्त झाले. या कुटुंबातील एक वर्षाच्या चिमुकलीनेही कोरोनावर मात केली. याशिवाय, काल म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध व्यक्तीलाही पुण्याच्या ससुन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे बारामती शहर सध्या कोरोनामुक्त झाले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:35 PM 01-May-20
