सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या विधानाचा आदित्य ठाकरेंकडून समाचार, म्हणाले…

0

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादीकडून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही मत व्यक्त केलं आहे. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणार का? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री जबाबदारी घेणार का, कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

या सगळ्या प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “माझी, शिवसेनेची किंवा महाविकास आघाडीच्या भूमिकेपेक्षा माझं लक्ष राज्यमंत्रिमंडळाकडे लागलं आहे. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणार का? कारण हा पहिला प्रसंग नाही. याआधी टीईटीचा घोटाळा समोर आला आहे. ओला दुष्काळ कुठे आहे हे देखील समोर आलं आहे. स्वत:च्या मतदारसंघातील बांधावर गेलेले नाहीत. महिलेला शिवीगाळ केली. सुप्रियाताई हा विषय बाजूल ठेवा, महिला खासदार हा विषय बाजूला ठेवा, पण कुठल्याही महिलेला शिवीगाळ करणं हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. त्यांच्या मनातलं लोकांसमोर आलं आहे. त्यांना पदमुक्त करणं गरजेचं आहेच, यावर उपमुख्यमंत्री काही जबाबदारी घेणार का, कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग काय कारवाई करणार याकडेही लक्ष लागलं आहे. कारण नुसत्या राजकीय नोटीस पाठवून चालणार नाही खरं जर महिला सुरक्षा महत्त्वाची असेल तर लगेच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

कुठल्याही मंत्रिमंडळात असा प्रकार झालेला नाही : आदित्य ठाकरे
शिवसेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही आंदोलन करण्याची गरज नाही. कधी कधी असं असतं की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात काळं असतं, वाईट असतं तर चुकून एखादी शिवी तोंडातून बाहेर येते, माफी मागतात लोक याला सभ्यता बोलतात. पण सभ्यतेची हद्द पार करुन एवढ्या वेळा शिवीगाळ करणं, कुठल्याही मंत्रिमंडळात असा प्रकार झाला नसेल.

मी आशिष शेलार यांच्याकडे लक्ष देत नाही : आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, निवडणूक लढवावी असं आव्हान आशिष शेलार यांनी दिलं आहे. याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की, “मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. अंधेरीत कोणी फॉर्म भरायला लावला कोणी फॉर्म मागे घ्यायला लावला हे लोकांसमोर आलं आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही.”

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 08/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here