रत्नागिरी : जरी देशभरात लॉकडाऊनमुळे सर्व नागरिक घरात बसून असले तरीही पोलिसांचा २४ तास पहारा चालू आहे. लॉकडाऊनमध्ये एक जमेची बाजू म्हणजे पोलिसांच्या डोक्याचा गुन्हेगारांचा ताण मात्र कमी झाला आहे. पोलिसांच्या खांद्यावर चेकपोस्ट वर तपासणीचे काम वाढलं असले तरी दुसरीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख घसरताना दिसत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात 40 ते 45 टक्के गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी 2019 ला मार्च महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, गर्दी मारामारी आदी 25 प्रकारचे 167 गुन्हे घडले होते; मात्र लॉकडाऊनमुळे यामध्ये मोठी घट झाली आहे. मार्च 2020 मध्ये 128 गुन्हे घडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 39 ने गुन्हे घटले आहेत. एप्रिल महिन्यातदेखील तीच परिस्थिती आहे. सुमारे 40 ते 50 टक्के गुन्हेगारीमध्ये घट झाली आहे. भाग 1 ते 6 म्हणजे जुगार, हत्त्यार अधिनियम, जीवनावश्यक वस्तू, दारूबंदी आदी मार्च 2019 ला 126 गुन्हे घडले होते. मार्च 2020 मध्ये 81 गुन्हे घडले आहेत. म्हणजे 45 गुन्ह्यांची घट झाली आहे. परिणामी, गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याने त्यांचा पोलिस ठाण्यातील ताण काहीसा कमी झाला आहे.
