नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी सन्मानाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री, नेते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी थोर समाजसेवक चंडिकादास अमृतराव देशमुख तथा नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न प्रदान करून सन्मानित केले गेले. दीनदयाल संशोधन संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांनी नानाजी देशमुख यांना जाहीर झालेला भारतरत्न स्वीकारला. तर, भूपेन हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका यांनी हा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
