टी-20 विश्वचषक: पाकिस्तान फायनलमध्ये; न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजयासह तिसऱ्यांदा जेतेपदाच्या शर्यतीत

0

उपांत्य फेरीत धडक मारणाऱया पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट्सनी शानदार विजयाची नोंद करीत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तिसऱयांदा धडक मारली. आता 13 नोव्हेंबरला मेलबर्न येथे होणाऱया जगज्जेतेपदासाठी त्यांची गाठ हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यातील विजेत्या संघाशी पडेल.

पाकिस्तानचा संघ जवळजवळ स्पर्धेबाहेर फेकला गेला होता, पण अननुभवी नेदरलॅण्ड्सने दक्षिण आफ्रिकेवर धक्कादायकरीत्या मात केली आणि या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले तर पाकिस्तानला जीवदान लाभत ते अनपेक्षितपणे उपांत्य फेरीत पोहोचले होते. पण आज पाकिस्तानने आपला जबरदस्त खेळ दाखवत न्यूझीलंडचा अक्षरशः धुव्वा उडवला. आधी नाणेफेक हरूनही पाकिस्तानने न्यूझीलंडच्या फलंदाजांना मुक्तपणे खेळूच दिले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 4 बाद 154 धावांपर्यंतच पोहचू शकला.

न्यूझीलंडचा निराशाजनक खेळ
फिन अॅलन आणि डेव्हन कॉन्वे हे दोघे मैदानात उतरले खरे, पण पहिल्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीला चौकार खेचणारा अॅलन तिसऱयाच चेंडूवर पायचीत झाला. विशेष म्हणजे दुसऱया चेंडूवरही पंचांनी त्याला पायचीत दिले होते, पण तिसऱया पंचांनी त्याला नाबाद ठरवले. कॉन्वेनेसुद्धा निराशा केली. शादाब खानने एका अप्रतिम चेंडूफेकीवर त्याला धावचीत केले. याच मैदानावर शतक ठोकणाऱया ग्लेन फिलीप्सकडून न्यूझीलंडला खूप अपेक्षा होत्या, पण तोसुद्धा अपयशी ठरला. मोहम्मद नवाजने त्याला अवघ्या 6 धावांवर झेलचीत केले. पन्नाशीतच आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यावर धावांची जबाबदारी कर्णधार केन विल्यम्सन आणि डॅरील मिचेल यांच्यावर पडली. दोघांनी 68 धावांची भागी केली, पण या भागीला वेग नव्हता. विल्यम्सनने 42 चेंडूंत 46 धावा केल्या. मात्र मिचेलने 35 चेंडूंत 53 धावा चोपल्याने न्यूझीलंडने 152 पर्यंत मजल मारली.

पाकिस्तानने जागवल्या 1992च्या आठवणी
1992 च्या विश्वचषकाच्या राऊंड रॉबीन सामन्यात पाकिस्तानचा सुमार खेळ झाला होता. तरीही इंग्लंडविरुद्ध मानहानीकारक पराभवाच्या उंबरठय़ावर असणाऱया पाकिस्तानवर पावसाची मेहेरबानी झाली आणि त्यांना रद्द झालेल्या सामन्याचा एक गुण मिळाला. या एका गुणानेच त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले होते. मात्र नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरीत धडक मारणाऱया पाकिस्तानने उपांत्य सामन्यात इंझमामच्या जोरदार खेळाच्या जोरावर न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि त्यानंतर अंतिम सामन्यातही त्यांनी इंग्लंडला हरवून आपले पहिले जगज्जेतेपद पटकावले होते. आता पाकिस्तानकडून त्याच कामगिरीची पुनरावृत्ती होतेय. सर्वप्रथम त्यांच्यावर साखळीत बाद होण्याची टांगती तलवार होती, पण नेदरलॅण्ड्सने द. अफ्रिकेला धक्का देत पाकला उपांत्य फेरीची गिफ्ट दिली होती.

बाबर-रिझवानने रचला विजयाचा पाया
साखळीतील पाच सामन्यांत केवळ 39 धावा करणाऱया कर्णधार बाबर आझमच्या बॅटमधून प्रथमच धावा निघाल्या आणि त्याने दमदार सलामीही दिली. बाबरच्या साथीने रिझवानही खंबीरपणे उभा राहिला आणि या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसे काढीत आपला अंतिम फेरी प्रवेशाचा पायाही रचला. बोल्टच्या पहिल्याच षटकांत बाबर शून्यावर झेल देऊन बसला होता, पण यष्टिरक्षक कॉन्वे हा झेल टिपण्यात अपयशी ठरला. इथे बाबर बाद झाला असता तर सामना निश्चितच थरारक झाला असता. बाबरने 43 चेंडूंत 57 धावा ठोकल्या तर रिझवानने 42 चेंडूंत 52 धावा काढल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 10/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here