नवी दिल्ली : आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार केरळमधील 98 जण दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस) मध्ये भरती झाल्याची माहिती आहे. यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जूनमध्ये यातील 38 जण मारले गेले आहेत. एका अधिकार्याने सांगितले की, जवळपास 15 दिवसांपूर्वीच केरळचा एक युवक आयएसकडून लढताना अफगाणिस्तानात मारला गेला आहे. सैफुद्दीन असे या युवकाचे नाव आहे. अमेरिका-अफगाणिस्तानच्या एका चकमकीत तो मारला गेला आहे. सैफुद्दीन केरळच्या मलप्पुरम येथील रहिवासी होता. मलप्पुरम, कन्नूर आणि कासरगोड हे केरळचे असे जिल्हे आहेत जिथून बहुसंख्येने लोक आयएस या दहशतवादी संघटनेत भरती झाले आहेत. या संघटनेतर्फे या लोकांना इराक आणि सीरियामध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना काबूलसह विविध ठिकाणी लढायला पाठवले जाते. सैफुद्दीन याने 2014 मध्ये शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर अचानकपणे तो सलाफी (उन्माद वाढवणार्या) विचारधारेकडे आकृष्ट झाला होता. 2014 मध्ये तो नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला होता. तेथे त्याने सलाफीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तो सलाफी जिहादी ग्रुप आयएसमध्ये सहभागी झाला. सैफुद्दीन 2018 मध्ये भारतात आला होता. 10 दिवसांनंतर तो पुन्हा दुबईला परत गेला. मोबाईलवरून त्याचे कुटुंबीयांशी बोलणे होत होते; पण तो कुठे होता हे त्याने कुटुंबीयांना सांगितले नव्हते. सैफुद्दीनला आयएसमध्ये भरती करणार्या लोकांना शोधले जात आहे. हे लोक केरळमध्ये असू शकतात. कारण, आयएसमध्ये सहभागी झालेली सैफुद्दीन तेथील एकमेव व्यक्ती नव्हता. त्याचा एक मित्र काही दिवसांपाासून गायब आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा त्याचा तपास घेत आयएसच्या कनेक्शनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
