मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला हलवण्याच्या निर्णयावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टीका केली आहे. केवळ नाव दिल्याने कुठलेही शहर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होत नसते. IFSC हे नाव घेतले म्हणून गांधीनगरला ते वित्तीय सामर्थ्य मिळणार नाही. जागतिक आर्थिक केंद्र मुंबईची ताकद राहीलच, ती शक्ती फक्त मुंबईतच आहे हे जग जाणते, अशी टीका सुभाष देसाई यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे की, ‘देशाचा अव्वल मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व्ह बॅंक, सेबी यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था मुंबईतच आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईकर ही ताकद यापुढेही उत्तुंग शिखरावर नेतील.’
