रत्नागिरी : सागरी मासेमारी अधिनियम आणि लॉकडाऊन मधील नियमांचा अवलंब करूनच मासेमारी सुरू असताना मत्स्य विभागाकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप पर्ससीन मच्छीमार संघटनांनी केला आहे. चुकीच्या पद्धतीने आरोप आणि या आरोपांच्या दबावाखाली कारवाई हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाई करा, अशी मागणी करण्याचा निर्णय संघटना पदाधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त भादूले यांच्यासह पथकाकडून होणार्या बंदरातील चुकीच्या कारवाईबद्दल वरिष्ठांकडे व मंत्र्यांकडे तक्रार करण्याचे ठरले आहे. शनिवारी ही बैठक झाली असून पथकाकडून झालेली कारवाई चुकीची कशी आहे, याचे पुरावेसुध्दा देण्यात येणार असल्याचे दोन्ही संघटना पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे.
