रत्नागिरी शहरातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त केले जाणार असून उत्सवासाठी येणाऱ्यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागणार नाही, असे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांसह अन्य रस्ते खराब झाले आहेत. रत्नागिरी पालिकेकडून गेले काही दिवस हे खड्डे सातत्याने बुजविण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु सकाळी भरलेल्या खड्ड्यांच्या जागी अतिवृष्टीमुळे सायंकाळी पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नागरिकांना या खड्ड्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, याची मला कल्पना आहे. गणपतीपूर्वी हे खड्डे पूर्णपणे डांबराने भरले जातील. खड्डे बुजविण्यासाठी ५० लाखांचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे. खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर करण्यात येणार असल्याने त्यावेळी दोन-तीन दिवस पावसाची उघडीप आवश्यक आहे. गणपतीपूर्वी रत्नागिरीकरांची खड्ड्यांची समस्या १०० टक्के सोडवली जाईल, असे सांगून साळवी यांनी सांगितले की हायवेसाठी वापरले जाणारे मटेरियल वापरायचे झाल्यास त्याचे अंदाजपत्रक तिपटीवर जाणार आहे. तरीदेखील त्याची माहिती घेण्यात येणार आहे. मुख्य रस्त्याच्या खालून अनेक ठिकाणी नळाच्या पाइपलाइन गेल्याने हे खड्डे पडत आहेत. मात्र आता नव्याने मंजूर झालेल्या पाइपलाइनच्या योजनेखाली दोन्ही बाजूने पाइप जाणार असल्याने योजना पूर्ण झाल्यानंतर नळाच्या कनेक्शनसाठी रस्ते खोदावे लागणार नाहीत. शहरात गॅस पाइपलाइन, रिलायन्स केबल आदींचे काम चालू आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतरच शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करावे लागणार आहे, असेही साळवी यांनी सांगितले. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
