शुक्रवारी (१ मे) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण २०१६पासून अव्वल क्रमांकावर विराजमान असणाऱ्या भारतीय संघाची थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलिया संघ सध्या जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी संघ बनला आहे. तर दुसरा क्रमांक न्यूझीलंड संघाने पटकाविला आहे. ऑस्ट्रेलिया संघ अव्वल क्रमांक पटकाविल्यामुळे आनंदी आहेच. परंतु ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यावेळी म्हटले की, भारताला त्यांच्या मायदेशात पराभूत करून खूप आनंद होईल. लँगर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “ऑस्ट्रेलियाची खरी परीक्षा भारतात असेल.” लँगर पुढे म्हणाले की, “आम्हाला माहिती आहे की, क्रमवारीत बदल होत असतात. परंतु सध्या आम्हाला आनंद झाला आहे. आम्हाला चांगला संघ बनवायचा आहे. त्यासाठी एक संघ म्हणून खूप काम करावे लागणार आहे. मागील २ वर्षांत मैदानामध्ये आणि मैदानाबाहेरही आम्ही चांगली कामगिरी केली आहे.” “निश्चितच आमचे लक्ष्य कसोटी चॅम्पियनशीप जिंकणे आहे. परंतु शेवटी आम्हाला भारतीय संघाला त्यांच्या मायदेशात पराभूत करावे लागेल. तसेच जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येईल तेव्हाही त्यांना पराभूत करावे लागेल,” असेही आपल्या लक्ष्याबद्दल बोलताना लॅंगर म्हणाले. “जर तुम्ही सर्वोत्तम आहात आणि तुम्ही सर्वोत्तम संघालाच पराभूत करता, तेव्हा तुम्ही स्वत:च निर्णय घेऊ शकता. सध्या आम्हाला काही समस्यांचा सामना करायचा आहे. जेव्हा कोणताही संघ अव्वल क्रमांकावर येतो, तेव्हा सर्व संघ त्या अव्वल क्रमांकाच्या संघाचा पराभव करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया संघाला आपला स्तर उंचवावा लागेल,” असेही लँगर पुढे म्हणाले.
