कोकण रेल्वेच्या पार्सल ट्रेनला काहीसा थंड प्रतिसाद

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या स्पेशल पार्सल गाडीच्या परतीच्या प्रवासात कोकणातून पावणेतीनशे हापूसच्या पेट्या आणि खाद्यपदार्थ अहमदाबाद, राजकोट आणि जामनगरला रवाना झाल्या आहेत. या गाडीच्या दोन्ही फेर्‍यांना कोकणातील आंबा बागायतदारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कोकणातील हापूस गुजरातसह विविध भागात पोचवण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाकडून ओखा ते विरुवअनंतपुरम अशी स्पेशल पार्सल ट्रेन सोडण्यात आली. या गाडीच्या दोन फेर्‍या झाल्या. पहिल्या फेरीप्रमाणेच दुसर्‍या फेरीतून खाद्यपदार्थ, औषधसाठा ओखा येथून कोकणासह दक्षिणेकडील भागांकडे आला. परतीच्या प्रवासात अधिकाधिक हापूसच्या पेट्या पाठवल्या जातील अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. कणकवलीतून 25 पेटी, राजापूरमधून 25 पेटी तर रत्नागिरीतून 225 पेटी हापूस जामनगर, अहमदाबाद, राजकोटला पाठविण्यात आला. दुसरी फेरी सुटली त्याचवेळी कोरोनामुळे अहमदाबाद मार्केटमधील कामकाज थंड पडले होते. परिणामी काही व्यापार्‍यांनी कोकणातील शेतकर्‍यांना आंबा पाठवू नका अशा सुचना दिल्या होत्या. त्याचा फटका रेल्वे पार्सल गाडीला बसला आहे. काही पेटींच्या ऑर्डरही रद्द केल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:25 PM 02-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here