जी-२०चे अध्यक्षपद मिळणे भारतीयांसाठी अभिमानास्पद : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

बाली : भारत जी-२० गटाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत अतिशय कृतिशील व सर्वसमावेशक धोरण स्वीकारणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

जगात वाढलेले भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, अन्नधान्य, ऊर्जा स्त्रोतांच्या गगनाला भिडलेल्या किमती या गोष्टींचे तडाखे बसत असतानाच्या काळात भारताकडे हे अध्यक्षपद आले आहे, याची जाणीव मोदी यांनी आपल्या भाषणात करून दिली.

बाली येथे आयोजित जी-२० गटाच्या दोन दिवसीय परिषदेचा बुधवारी समारोप झाला. त्याआधी झालेल्या समारंभात इंडोनेशियाने भारताला पुढील एक वर्षासाठी या गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. रशियाने युक्रेनवर लादलेले युद्ध, जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या परिषदेत विविध देशांमधील मतभेद उघड झाले होते.
त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, अध्यक्षपदाच्या काळात भारत नवीन संकल्पना मांडेल, प्रत्यक्ष कृतीवर भर देईल. कोरोनाचा जगावर झालेला परिणाम दूरगामी आहे. त्याशिवाय अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. अशा स्थितीला सामोरे जाताना भारत अतिशय सर्वसमावेशक भूमिका स्वीकारणार आहे.

डिजिटल क्रांतीचे फायदे प्रत्येकाला मिळावेत
जी-२० गटाचा नवा अध्यक्ष असलेल्या भारताच्या कार्यकाळाला येत्या १ डिसेंबरपासून प्रारंभ होईल. जी-२० परिषदेतील एका स्वतंत्र सत्रात मोदी म्हणाले की, डिजिटल क्रांतीचे फायदे मानवी समूहाच्या लहानशा हिश्शालाच मिळता कामा नये. प्रत्येकाला डिजिटल क्रांतीचे फायदे मिळावेत, यासाठी येत्या १० वर्षांत प्रयत्न केले पाहिजेत.

दरवर्षी ३ हजार भारतीयांना नोकरीसाठी ब्रिटनचा व्हिसा
दरवर्षी भारतातील १८ ते ३० वर्षे वयोगटातील ३ हजार पदवीधर युवकांना ब्रिटनने नोकरीसाठी व्हिसा देण्याचे ठरविले आहे. या व्हिसाची मुदत दोन वर्षे असणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जी-२० गटाच्या बाली येथील परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार ही योजना जाहीर करण्यात आली आहे.

नैसर्गिक स्रोतांवरून जगात वादंग : माेदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नैसर्गिक स्रोतांच्या मालकीवरून सध्या जगात वाद सुरू असून, त्यातून होणाऱ्या संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती पर्यावरण नुकसानीचे मोठे कारण बनली आहे. त्यामुळे पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी योग्य पावले उचलणे आवश्यक आहे.

जी-२०च्या बैठका होणार विविध राज्यांमध्ये
विकासासाठी उपयुक्त माहिती’ हे सूत्र स्वीकारून भारत जी-२० गटाच्या अध्यक्षपदाच्या काळात आपले कामकाज करणार आहे. हे अध्यक्षपद मिळणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. जी-२० गटाच्या बैठका भारतातील विविध राज्ये, शहरांमध्ये आयोजिण्यात येतील. भारतामध्ये विविध परंपरा व सांस्कृतिक समृद्धी आहे. त्याचा अनुभव जी-२० देशांना द्यावा, अशी आमची इच्छा आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 17/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here