राहुल गांधींच्या शेगावमधील सभेचे चिपळूणला आज एलईडी स्क्रीनवर होणार थेट प्रक्षेपण

0

चिपळूण : शेगाव (जि. बुलढाणा) शेगाव येथे आज (दि. १८ नोव्हेंबर) काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची सभा होणार आहे. या सभेचे चिपळूणमध्ये भव्य एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.

चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात दुपारी ३ वाजता हे थेट प्रक्षेपण होणार आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात दाखल झाली आहे. ती आज बुलढाणा जिल्ह्यात पोहोचली आहे. या यात्रेदरम्यान आज, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शेगाव येथे श्री. गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशातील ही सर्वांत मोठी सभा होणार असून या सभेला सुमारे आठ लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. भारत जोडो यात्रेला देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात ही यात्रा दाखल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून विविध जिल्ह्यांतून पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होत आहेत. काँग्रेसच नव्हे, तर महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनीही भारत जोडो यात्रेत सहभागी होऊननफरत छोडो, भारत जोडोचा संदेश दिला आहे.

चिपळूण तालुक्यासह जिल्हाभरातूनही अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या यात्रेत आपला सहभाग नोंदवला आहे तर काही पदाधिकारी व कार्यकर्ते शेगाव येथील या विराट सभेला उपस्थित राहणार आहेत. चिपळूणपासून बुलढाणा जिल्ह्यातील या सभेला पोहोचणे सर्वांनाच शक्य होणार नाही. त्यामुळे इच्छा असूनही राहुल गांधींच्या यात्रेत आणि सभेला उपस्थित न राहू शकणाऱ्यांचा होणारा हिरमोड टाळण्यासाठी चिपळुणातील पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमींना राहुल गांधी यांच्या शेगाव येथील या विराट सभेचा चिपळूणमध्ये भव्य एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाचा आनंद लुटता येणार आहे. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात दुपारी ३ वाजता हे थेट प्रक्षेपण सुरू होईल.

चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली माजी उपनगराध्यक्ष आणि शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक सुधीर शिंदे, माजी नगरसेवक करामत मिठागरी, माजी नगरसेवक कबीर काद्री, माजी नगरसेविका सफा गोठे, काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष रवीना गुजर, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले तसेच तालुका, शहर, काँग्रेसच्या विविध विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चिपळूणमध्ये ही सभा दाखविण्याचे ठरविले आहे.

सर्व संबंधितांनी या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 18/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here