आजपासून ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील निर्बंध काहीसे शिथिल; रेड झोन साठी सबुरीचे धोरण

राज्यात करोना रुग्णांच्या संख्येनुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशी विभागणी केल्यानंतर आता लॉकडाउनमधून रेड झोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अनेक अटी राज्य सरकारने शिथिल केल्या आहेत. त्यामुळे ऑरेंज व ग्रीन झोनमधील दुकाने बऱ्यापैकी खुली होतील. मात्र, मुंबई, ठाणे, पुण्यातील परिस्थिती वेगळी असल्याने या भागांत सबुरीचेच धोरण अवलंबिण्यात आले आहे. रेड झोनमध्ये स्वतंत्रपणे असलेली दुकाने, खासगी कार्यालये, बांधकामे यांना परवानगी असली तरी राज्यातील विशेषत: मुंबई आणि पुणे या महानगर क्षेत्रांतील कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र त्यावर पूर्ण बंदीच असेल. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासही निर्बंध लागू आहेत.

HTML tutorial

राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनाकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन भाग करण्यात आले आहेत. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत, पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. त्याशिवाय कोविड 19 लागण प्रमाणानुसार स्थानिक प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रात कंटेन्मेंट झोन (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड, पोलिस ठाण्याचे क्षेत्र आदी) तयार केले आहेत. दुकानांबाबत सवलती देताना या भागांचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची एकल दुकाने सुरू करण्याची सवलत देताना ती दुकाने कंटेन्टमेंट झोनमध्ये नसतील. यात मद्याच्या दुकानांना हाच नियम लागू असेल. एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाच पेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने, असा असेल. कोणते दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन करील. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील. नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नसेल. ज्या रेड झोन भागात बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय असणे बंधनकारक असणार आहे. रेडझोनमध्ये शासकीय कार्यालये ही पूर्वीप्रमाणे 5 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये 33 टक्के कर्मचाऱ्यांसह खासगी व शासकीय कार्यालये सुरू राहतील. ऑरेंज व ग्रीन झोन व्यक्तिरिक्त कंटेन्टमेंट झोन वगळता इतर रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका बाजूकडील (एका लेनमधील) जीवनावश्यक वस्तू नसलेली स्वतंत्रपणे असलेली पाच दुकाने (स्टॅंड अलोन) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पाच दुकानांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानाचा समावेश आहे. मात्र, एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त जीवनावश्यक नसलेली दुकाने सुरू करता येणार नाहीत. ही दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे यासारखी इतर नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक असणार आहे. तसेच शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, बाजार यामधील दुकाने ही बंदच राहतील. कंटेंटमेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व निर्बंध असणार असून जीवनावश्यक वस्तू नसलेली एकल दुकाने व बांधकामांनाही या झोनमध्ये बंदी असणार आहे. रेडझोनसह इतर झोनमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिली असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईमध्ये कंटेन्टमेंट झोन असल्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांसाठी कोणतीही रेल्वे सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here