राज्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, रायगड, पालघर, या भागातील लोकांची स्थिती गंभीर आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र व राज्य सरकारने या सर्व पूरग्रस्त भागात १०० टक्के कर्जमाफी देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राज्यातील पूरस्थितीबाबत पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पूरग्रस्त भागात पिकांच्या उंचीपेक्षा अधिक पाणी साचले आहे. हा पट्टा उसाचा आहे. उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळींबाला फटका बसला आहे.
जमिनीवरची माती वाहून गेल्याने दीर्घकालीन नुकसान झाले आहे. तसेच दुधाचे संकलन आणि पुरवठ्याचे हे जिल्हे मुख्य केंद्र आहेत. त्यालाही धक्का बसलेला आहे. राज्यात अशी परिस्थिती कधीच नव्हती. पाणी ओसरल्यानंतर लागलीच राज्य सरकारने पंचनामे करून मदत करावी. नुकसान झाल्याचे प्रमाण पाहता या भागात संपुर्ण कर्जमाफी करावी. प्रशासकिय यंत्रणा कमी पडत आहेत. उणीदुणी काढण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देणार आहेत. त्यासोबतच ते लोकांना औषधे पुरवतील. तर राष्ट्रवादीचा डॉक्टर सेल प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शिबिरं घेतील. असे त्यांनी सांगितले. तर ही स्थिती सरकारमुळे ओढवली. कर्नाटक सरकारने वाद न घालता लोकांना मदत करावी. राज्य सरकार कमी पडत असेल तर केंद्र सरकारने मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे शरद पवार म्हणाले.
