स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरुन राजकारण करणे हा भाजपचा खेळ : सुषमा अंधारे

0

मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या विधानानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलीच आक्रमक झाली. मात्र, यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरले जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

द्वेषमूलक राजकारण पसरवले जात आहे. या द्वेषमूलक राजकारणामध्ये जाती आणि धर्म एकमेकांना हरवण्याच्या नादात माणूसकी हरली आहे. हाच महत्त्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान आणि त्यानंतर सुरू झालेला नवा वाद यावर बोलताना, हा वाद फक्त लक्ष विचलित करण्यासाठी केला जात आहे. भारतीय जनता पक्षाला सावरकरांविषयी खरेच प्रेम वाटत असते, तर आतापर्यंत त्यांना भारतरत्न देऊन मोकळे झाले असते, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव सोयीनुसार वापरायचे आणि राजकारण करायचे हा भाजपचा खेळ आहे. अनेक मुद्दे आहेत, जेव्हा हे कुठेच दिसत नाहीत. लोकांच्या जगण्या-मरण्यासंबंधीचे प्रश्न असतात, तेव्हा हे येत नाहीत. परंतु, जेव्हा जेव्हा यांना वाटते की, यांचे अपयश उघड पडत आहे, तेव्हा ते वादंग करण्यासाठी झटकन पुढे येतात, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

दरम्यान, महाप्रबोधन यात्रेवर टीका करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, चंद्रकांत खैरे आऊड-डेटेड झालेले आहेत. म्हणूनच सुषमा अंधारे यांना आणले आहे, अशी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना, संदीप देशपांडेसारख्या कोणत्या आऊड-डेटेड माणसाचा प्रश्न विचारता, असा सवाल करत, अशा लोकांना उत्तरेही देऊ नये. राहिला प्रश्न चंद्रकांत खैरे यांचा ते ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठच राहणार, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:38 PM 19/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here