रत्नागिरी : प्रवासाची कोणतीही परवानगी नसताना विलेपार्ले (मुंबई) येथून देवूड येथे गावी आलेल्या एका महिलेविरोधात रत्नागिरीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला सध्या रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात क्वारंटाइन करण्यात आले आहे. आपण इनोव्हा गाडीतून देवूड येथे आल्याचे सांगत त्या महिलेने सांगितले असून त्या गाडीचा शोध पोलीस घेत आहेत. ही महिला २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता आली असल्याची माहिती देऊडच्या सरपंच यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी त्याबाबतची खात्री करून त्या महिलेला शासकीय रुग्णवाहिकेतून तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे त्यांची तपासणी करून त्यांना एमआयडीसी येथे संस्थात्मक क्वारंटाइन केले आहे. राज्यात संचारबंदी कलम १४४ लागू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचे आदेश जारी केलेले असताना कोणतेही कौटुंबिक कारण अथवा वैद्यकीय अत्यावश्यक निकड नसताना जिल्ह्यात त्या महिलेने प्रवेश केला. त्यामुळे त्या महिलेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
