नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामधील चकमकीच्या घटनेनंतर भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी पाकिस्तानला आज थेट इशारा दिला आहे. पाकिस्तानने सीमेवर चिथावणीखोर गोळीबार आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे धोरण सोडले नाही तर सणसणीत प्रत्युत्तर दिले जाईल, असं नरवणे यांनी म्हटलंय. करोना संकटाचा सामना करण्याऐवजी दहशतवाद्यांची घुसखोरी वाढवण्याकडे पाकिस्तानचे अधिक लक्ष आहे, असं नरवणे म्हणाले. गेल्या शनिवारी हंदवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे ५ जवान शहीद झाले होते. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. चिथावणीखोर गोळीबार केला जात आहे. भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या एकमेव अजेंड्यावर पाकिस्तानचे अजूनही काम सुरू आहे. पाकिस्तान हा संपूर्ण जगासाठी एक संकट बनला, असं नरवणे म्हणाले. दहशतवादाला पाठिंबा देण्याचे धोरण पाकिस्तान सोडत नाही तोपर्यंत त्याला भारताकडून सणसणीत प्रत्युत्तर मिळत राहील. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर पाकडून होत असलेल्या गोळीबाराला आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीला भारताकडून सडेतोड उत्तर मिळेलच, असा इशारा नरवणे यांनी दिला. हंदडवाडामधील चकमकीत ५ जवान शहीद झाले. या चकमकीत निष्पाप नागरिकांचा मृत्यू होऊ नये याची पूरेपूर काळजी शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांनी घेतली. त्यांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीमेचे नेतृत्व करत नागरिकांसाठी प्राणांची आहुती दिली. लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसांचे हे शौर्या अतुलनिय आहे, असं म्हणत लष्कर प्रमुख नरवणे यांनी शहीदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
