
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने आज मोठा दावा केला आहे. भारतीय संघाच्या माजी गोलंदाजाकडे 900 विकेट्स घेण्याची क्षमता असल्याचा दावा केला. गंभीरच्या मते DRSचा शोध आधी लागला असता तर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे 900 विकेट्स घेऊ शकला असता. ”कुंबळेच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला DRSचा शोध लागला असता तर त्याच्या नावावर 900 विकेट्स असत्या. या टेक्नॉलॉजिचा हरभजन सिंगलाही फायदा झाला असता. DRS शिवायच कुंबळे हा यशस्वी गोलंदाज आहे,” असे गंभीर म्हणाला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत कुंबळेचा तिसरा क्रमांक येतो. त्यानं 132 कसोटीत 619 विकेट्स आहेत. भारताकडून इतक्या विकेट्स कोणीच घेतलेल्या नाही. मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न हे आघाडीवर आहेत. हरभजन सिंगनं 103 कसोटीत 417 विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत भज्जी तिसऱ्या स्थानावर आहे. गंभीर म्हणाला,”DRSच्या तंत्रज्ञानामुळे कुंबळेच्या नावावर 900,तर हरभजनच्या नावावर 700 विकेट्स असत्या. फ्रंट फूवर पायचीत होण्याचा निर्णय त्यांच्या काळात नव्हता.” दरम्यान, गंभीरनं सर्वोत्तम कर्णधार म्हणून अनिल कुंबळेची निवड केली होती. पण, विक्रमानुसार धोनीला हा मान देईन, असेही गंभीर म्हणाला होता. ”सौरव गांगुलीची कामगिरी दमदार आहे. पण, अनिल कुंबळेला सर्वाधिक काळ कर्णधार झालेलं पाहायला आवडलं असतं. कुंबळेच्या नेतृत्वाखाली मी केवळ सहा कसोटी सामने खेळलो. कुंबळेला दीर्घ काळ कर्णधारपदाची जबाबदारी दिली असती, तर त्याने अनेक विक्रम मोडले असते. 2007मध्ये त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आणि तेव्हा त्याच्या कारकिर्दीला 17 वर्ष झाली होती,” असे गंभीर म्हणाला होता.
