रत्नागिरी : अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याच्या इशाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकही मच्छीमार नौका अद्याप समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नाही. अशावेळी रायगडातील शेकडो मच्छीमार नौका जयगड बंदरात आश्रयाच्या नावाखाली येऊन मिळालेली मासळी या बंदरात उतरून विकण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु, स्थानिक मच्छीमारांनी तीव्र विरोध केल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. बंदर परवान्यानुसार ज्या बंदराचा परवाना असतो त्याच बंदरांवर संबंधित नौकांना मासळी उतरवता येते. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांनी १० ऑगस्टपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने सावधानतेचा इशारा दिला. १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली तरी मुसळधार पाऊस आणि खवळलेल्या समुद्रामुळे स्थानिक एकही मच्छीमार नौका मासेमारीसाठी गेलेली नाही. जिल्ह्यात ४ हजारांपेक्षा अधिक मच्छीमार नौका आहेत. एकीकडे जिल्ह्यातील मासेमारी ठप्प असतानाच रायगडातील ‘दमानी’ मासेमारी करणाऱ्या नौका समुद्रात मासेमारी करून बुधवारी जयगड बंदरात आश्रयासाठी म्हणून आल्या. या नौकातील मासळी उतरून ती येथे विकण्याचा घाट घातला जात होता. परंत, स्थानिक मच्छीमारांनी तीव्र विरोध केला. मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रारी केल्यानंतर अधिकारीवर्गही तातडीने जयगड बंदरावर दाखल झाला. अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिल्याने दमानी नौकांवरील मासळी उतरली गेली नाही. मंगळवारपासून या नौका जयगड बंदरातून बाहेर पडू लागल्या.
