दाभोळ : दापोली तालुक्यातील माटवण येथे चिऱ्याचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकच्या हौद्यात बसलेल्या महिलेच्या अंगावर चिरे पडून तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना येथे रविवार दि. ३ मे रोजी सकाळी घडली. ट्रकचालक विशाल कलेकर हे ट्रकमध्ये (एमएच-०८-एच-१३१९) बोंडीवली येथील चिरेखाणीवरून चिरे भरून कामगारांना घेऊन माटवण येथे निघाले होते. सकाळी १०.३० च्या सुमारास त्यांची गाडी माटवण मोरेवाडी येथे आली असता, अचानक चालकाच्या बाजूचा रस्ता खचला व ट्रक चालकाच्या बाजूने उलटला. ट्रकच्या हौद्यात बसलेल्या गंगुबाई रुपमपूर (वय ४२) यांच्या अंगावर चिरे पडून त्या गंभीर जखमी झाल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी चालक विशाल कालेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
