मुंबई : शिवसेनेचे मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’मधून वित्तीय सेवा केंद्राच्या अनुषंगाने केंद्र सरकारसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. वित्तीय सेवा केंद्राचा वाद हा मराठी विरुद्ध गुजराती आहे या भ्रमात कोणी राहू नये. हा राज्याच्या हक्काचा आणि अस्मितेचा, त्याहीपेक्षा प्रशासकीय तयारीचा विषय आहे, असं सांगतानाच महाराष्ट्राच्या न्याय हक्काचा आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावरील मुंबईच्या नैसर्गिक अधिकाराचा हा प्रश्न आहे. अशावेळी महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी गुजरातची वकिली कसली करता? असा सवाल शिवसेनेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. विरोधी पक्षात असताना शिवसेनेने यावर आवाज उठवला. आता हे काम फडणवीस व त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने केले पाहिजे. फडणवीस हे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू धरून बोलत असतील तर हा असला विरोधी पक्ष कुचकामी आहे, असा ‘सामना’तून फडणवीसांवर टोला लगावला आहे.
