प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार?; अजित पवारांचं मोठं विधान

0

मुंबई : देशात लोकशाही टिकविण्यासाठी, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी केवळ लोकांना जागे करून चालणार नाही, तर यासाठी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे, असं विधान करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याची साद घातली.

उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे कौतुक करतानाच आम्ही पहिल्यांदा जरी एका मंचावर आलो असलो, तरी आमचे वैचारिक व्यासपीठ एकच असल्याचे सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी देखील एक महत्वाचं विधान यावेळी केलं. वैदिक विचार आणि संतांचे विचार यातील फरक सांगतानाच संतांच्या विचारांतूनच लोकशाही साधली जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या विधानानंतर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही वंचित बहुजन आघाडीबाबत भाष्य केलं आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्यास तयार आहे. मतविभागणी होऊ नये, यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावं, ही आमची भूमिका आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान देश गुलामगिरीकडे चालला असताना आपण नुसते बघत राहणार असू तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.’प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ या ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांच्या वेबसाइटचे रिलाँचिंग होतं, तेव्हा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:19 PM 23/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here