खारेपाटण : राज्यासह देशभर लॉकडाऊन जाहीर केलेले असताना मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवा दारूची बिनधास्त वाहतूक सुरू आहे. खारेपाटण चेक पोस्ट येथे रविवारी सकाळी ७ वा. गोवा दारूची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. टेम्पोतील मॅकडॉल दारूचे ९० बॉक्स अंदाजे किंमत ५ लाख ४० हजारांची दारू जप्त करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. हा टेम्पो गोवा येथून नवी मुंबई-तळोजा येथे टॉयलेट क्लीनरचे बॉक्स घेवून जात होता. हा टेम्पो रविवारी सकाळी ७ वा.खारेपाटण चेकपोस्टला पोचला. पोलिस नाईक रवींद्र देवरूखकर यांनी हा टेम्पो तपासणी करण्याकरिता थांबविली असता टेम्पोमध्ये टॉयलेट क्लीनरचे बॉक्स असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी तपासणी केली असता टॉयलेट क्लीनरच्या बॉक्स खाली गोवा बनावटीचे मॅकडॉल दारूचे ९० बॉक्स आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचालक प्रमोद सखाराम राऊळ (२८, रा.कसाल), रामधनी रामलखन केवट (३०, मध्यप्रदेश) व सिद्धेश सखाराम बोडेकर(३८, दोडामार्ग कसई) यांना ताब्यात घेतले.
