पावसाचा जोर कमी झाल्यावर मदत कार्याला वेग

0

रत्नागिरी : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात असणारा पावसाचा जोर कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली. सोबतच आता रोगराई पसरु नये याची खबरदारी घेतली जात आहे. बाधीत व्यक्तींना तातडीची मदत प्रशासनाने दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसामुळे चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून भेंदवाडी हे गाव वाहून गेले होते. यासह आतापर्यंत २८ व्यक्तींचा पूरात मृत्यु झाला आहे. इतर अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २२ जणांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत पुरविण्यात आली आहे. या पावसाळ्यात १५९ जनावरे वाहन गेली तर ७६३ घरांचे नुकसान झाले आहे. सर्व मालमत्तेचे आतापर्यंत झालेले नुकसान १० कोटी २८ लाख रुपयांचे आहे. यामध्ये शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाही. अनेक ठिकाणी शेतात पाणी असल्याने आणखी तीन-चार दिवसांनी शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पूर परिस्थितीत मदतीसाठी एनडीआरएफचे २४ जवान तसेच कोस्टगार्ड ८० जवान आणि ४ बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. चिपळूणमध्ये एनडीआरएफचे जवान कार्यरत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. महसूल विभागातील सर्वच स्थरातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे. चिपळूण आणि खेड जलमय झाल्याने त्या भागात वेगळया ४ बोटींची मदत होत आहे. याखेरीज तपास व इतर मदत कार्यासाठी टोळकेश्वर येथील एक रडार केंद्र, ७ पाणबुडे आणि ५ स्वंयसेवी संस्थांची मदत प्रशासनाला होत आहे. आरोग्य तपासणी पुरानंतर आजार पसरण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय सुरु आहेत. चिपळूण, खेड तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. महामार्ग यंदाच्या पावसाळयात चिपळूणमधील वाशिष्टी नदीला पूर आल्याने १० वेळा तर खेड जवळ जगबुडी नदीला पूर आल्याने १३ वेळा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली. राजापूर तालुक्यात अर्जुना नदीच्या पूराची पातळी वाढल्याने कोदवली पुलावरील वाहतूक ११ वेळा बंद झाली. जगबुडीची नदीची पातळी ९.५ मीटरपर्यंत वाढल्याची नोंद या काळात झाली. २०१६ साली याठिकाणी सर्वाधिक ११.३ मीटर पातळीची नोंद आजवर झाली आहे. सतत मुसळधार पावसामुळे जमिनीला भेगा पडण्याचा घटना या काळात मोठया प्रमाणात घडल्या. गुहागर आणि दापोली तालुके वगळता इतर तालुक्यात २६ ठिकाणी जमिनीला भेगा गेल्याची नोंद प्राप्त झाली आहे. यामध्ये १० गावांच्या परिसरात तर १६ रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. यामध्ये आंबा घाटात मोठ्या भेगा पडल्या असून, याठिकाणी एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. अवजड वाहने बंद ठेवण्यात आली असून, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना पोलिस बंदोबस्तात आंबा घाटातून सोडण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here