बागायतींना चौपट वीजबिले, सर्वपक्षीय उठाव करणार : आमदार शेखर निकम

0

रत्नागिरी : अकृषीच्या नावाखाली बागायतींना चौपट वीज बिले आकारण्यात आली आहेत. शेतकर्यांवर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात सर्वपक्षीय उठाव करणार आहे, असा इशारा चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिला आहे.

रत्नागिरी आणि कोकणातील अन्य सर्व कृषि, शेती पंपांची वर्गवारी ही अकृषीमध्ये करण्यात आली असल्यामुळे आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागांना पाणी देण्याच्या शेतीपंपांची बिले अव्वाच्या सव्वा येत आहेत. हा निकष महावितरण कंपनीने फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच लागू केला असून राज्यातील अन्य जिल्ह्यांत कृषि दराने बिले आकारली जातात. याविरोधात आंबा बागायतदारांनी उठाव करण्याचा निर्धार केला असून आमदार शेखर निकम यांनीही हा प्रश्न कोकणातील मंत्री, सर्व आमदार, खासदारांमार्फत राज्य शासनापुढे मांडणार असल्याचे जाहीर केले आहे.

रत्नागिरीतील काही आंबा, काजू बागायतदारांचे वीजबिल चौपट आले आहे. याबाबत प्रा. नाना शिंदे, सुभाष पोतकर, यज्ञेश पोतकर यांच्यासह काही बागायतदारांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयात आमदार शेखर निकम यांची भेट घेतली आणि भविष्यातील आंदोलनावर चर्चा केली. प्रत्येक तालुक्यातील बागायतदारांना एकत्र करून भविष्यात महावितरणच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार निकम यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here