रत्नागिरी : ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेमध्ये वाईन शॉप सुरू होणार असल्याची बातमी रविवारीच सर्वत्र पोहोचली होती. त्यामुळे सकाळपासून वाईन शॉप उघडण्याआधीच सकाळी ८ वाजल्यापासूनच रत्नागिरीतील वाईन शॉपसमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तळीराम उभे होते. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने दुकाने सुरू करण्याबाबत कोणतीच परवानगी न दिल्याने अखेर तळीरामांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. १२ वाजले तरी कडक उन्हात अनेकांनी संयम बाळगला. दुपारपर्यंत वाईन शॉप सुरू न झाल्याने तळीरामांची चुळबुळ सुरू झाली. यासंदर्भात कोणती माहिती आली आहे का, याची चाचपणी सुरू झाली. काही दुकान मालकांनी राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात जाऊन विचारणाही केली. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर आयुक्तांनी दुकाने सुरू करण्याबाबत कोणतेच आदेश दिले नसल्याचे पुढे आले. त्यामुळे रत्नागिरीतील दुकाने बंदच ठेवण्यात आली होती. अखेर सकाळपासून रांगेत उभे राहून मद्याची प्रतीक्षा करणाऱ्या तळीरामांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.
