यशवंतराव चव्हाण यांची आज 38 वी पुण्यतिथी, मुख्यमंत्र्यांनी केलं अभिवादन

0

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज 38 वी पुण्यतिथी आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी शेती, उद्योग, शिक्षण, सहकार, सिंचन या क्षेत्रात मोठं काम केलं आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रितीसंगमावर जावून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांच्याबरोबर मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे आमदार महेश शिंदे उपस्थित होते.

समाधीस्थळी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. सकाळपासून नागरिकांनी प्रितीसंगमावरील समाधीस्थळी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. तसेच विविध राजकीय नेत्यांनी देखील यशवंतराव चव्हाण यांना समाधीस्थळी जावून अभिवादन केले. यामध्ये साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, नरेंद्र पाटील या नेत्यांनी प्रितीसंगमावर जावून अभिवादन केलं.

शरद पवार यांनी केलं अभिवादन

शेती, सहकार, शिक्षण, औद्योगिक या क्षेत्रांत अनेक लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा विकास केला. महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत त्यांनी भरीव योगदान दिले. यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही ट्वीट करत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी रचलेल्या पायावरच आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा : अजित पवार

यशवंतराव चव्हाण साहेबांनी रचलेल्या पायावरच आजचा आधुनिक, प्रगत, पुरोगामी महाराष्ट्र उभा असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया रचला. कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध महाराष्ट्र घडवला. नाटक, चित्रपट, गायनासारख्या कलांना प्रोत्साहन दिलं. औद्योगिकरण, अर्थकारणाला आश्वासक दिशा दिली. समाजातील मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, युवक या समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणून विकासाची संधी दिली. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिल्याचे अजित पवार म्हणाले.
चव्हाण साहेबांचा विचार पुढे घेऊन जाणं आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असेही अजित पवार म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 25/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here