रत्नागिरी : शासनाने मुभा दिलेल्या गोष्टींसाठीच नागरिकांनी बाहेर पडावे, असे ना. उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. शिथिलता मिळाल्यावर झालेल्या गर्दीवर श्री. सामंत यांनी भाष्य केलं. ‘शासनाकडून आलेली नियमावली योग्यप्रकारे न समजल्यानेच बाजारपेठेतील दुकाने उघडली गेली. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे पालन नागरिकांनी केले पाहिजे. सर्व व्यापारी संघटनांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणची दुकाने सुरू राहणार नाहीत. त्याचप्रमाणे शिथिलता दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बाहेर गर्दी केल्याने जिल्हांतर्गत प्रवासाची दिलेली मुभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. नागरिकांनी शिथिलतेमध्ये नियमांचे पालन करावे, जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी लागू असून यावेळी नागरिकांनी बाहेर फिरू नये, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.
