रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोलीमध्ये काल कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्त तालुक्यांची संख्या आणखी एकाने कमी झाली असून जिल्ह्यातील नऊपैकी लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यांत एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नसल्याने लांजा आणि राजापूर हे दोनच तालुके तूर्त तरी कोरोनामुक्त राहिले आहेत. शृंगारतळी (ता. गुहागर) येथे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्याला रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू असतानाच रत्नागिरीजवळच्या राजिवडा भागात नवा रुग्ण आढळला. त्यापाठोपाठ अलसुरे (ता. खेड) येथे दुबईतून आलेल्या एकाला करोनाची लागण झाल्याच्या शक्यतेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रयोगशाळेकडे पाठविलेल्या त्याच्या नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. मात्र तो करोनाबाधित होता हे त्याच्या अहवालावरून सिद्ध झाले. ही प्रक्रिया होत असतानाच रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील एकाच घरातील तिघांना करोना झाला. एक महिला आणि तिची जाऊ बाधित झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याच कुटुंबातील सहा महिन्यांच्या बालकाला करोना झाला. त्यानंतर पंधरा दिवस एकही रुग्ण आढळला नाही. एकाच घरातील सहा महिन्यांच्या त्या बालकासह दोघी महिलांना करोनामुक्तीनंतर घरी पाठविण्यात आले. पण त्याच आठवड्यात खांदाटपाली (ता. चिपळूण) आणि बामणोली (ता. संगमेश्वर) येथे एक पुरुष आणि एक महिला करोनाबाधित आढळली. त्यानंतरच्या २४ तासांत तिडे (ता. मंडणगड) आणि पूर (ता. संगमेश्वर) येथेही एक पुरुष आणि एक महिला करोनाबाधित झाली. त्यापाठोपाठ तिसऱ्या दिवशी माटवण-नवानगर (ता. दापोली) येथे एक महिला करोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात सहा महिन्यांच्या बालकासह सहा पुरुष पुरुष आणि पाच महिला करोनाबाधित झाल्या. सर्वाधिक चार रुग्ण रत्नागिरी तालुक्यात, त्याखालोखाल संगमेश्वरमध्ये दोन महिला रुग्ण आणि गुहागर, चिपळूण, खेड, मंडणगड आणि दापोली येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ वर पोहचली असून ५ रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
