नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी संवाद साधत आहेत. आज मंगळवारी त्यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी, आज देशाला पैशाची चिंता भेडसावत आहे. बँकांसमोर अनेक आव्हानं आहेत तसंच नोकऱ्या वाचवणंही कठीण होऊन बसतं, यावर राहुल गांधी यांनी प्रकाश टाकत बॅनर्जीना मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर, ‘देशाला एका आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. अमेरिका-जपान सारख्या देशांनीही हेच केलं आहे. परंतु, आपल्याकडे मात्र असं घडलेलं नाही. छोट्या उद्योगांना मदतीची गरज आहे. या तिमाहीचं कर्ज माफ करण्याची गरज आहे.’ असं अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटलं. देशात सध्या मागणीचा अभाव आहे. कारण अनेकांकडे पैशांची चणचण असल्यानं ते काही विकत घेत नाहीत. अशावेळी लोकांकडे आर्थिक मदत पोहचण्यासाठी उशीर होणं परवडणार नाही. लॉकडाऊनमुळे उद्योग-धंदे ठप्प आहेत, त्यांनाही आर्थिक मदतीची अधिक आवश्यकता आहे, असंही अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटलं. लॉकडाऊनमधून जेवढ्या लवकर बाहेर येता येईल, तेवढं चांगलं आहे परंतु, त्यानंतरही एक ठोस योजना असायला हवी अन्यथा सर्व काही फोल ठरेल, असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं. त्याला अभिजीत बॅनर्जी यांनी होकार देत, आपल्याला या फैलावाबद्दल माहीत आहे, केवळ लॉकडाऊन वाढवून काहीच साध्य होणार नाही असं मत मांडलं. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एका वातावरणाची आवश्यकता आहे. अशा वेळी राज्य सरकारला अधिक मदत करावी लागेल त्यामुळे सामान्यांपर्यंत पैसे पोहचू शकतील. गरीबांसाठी केंद्रानं नव्या योजना आणण्याची गरज नाही. ही जबाबदारी राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडे सोपवून गरीबांना थेट लाभ पोहचवायला हवा, असं म्हणत बॅनर्जी यांनी सत्तेच्या केंद्रीकरणावर टिप्पणी केलीय. ही वेळ धोका पत्करण्याची आहे, कारण ही वेळेची मागणी आहे, असंही अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटलं.
