रत्नागिरी : कोकण रेल्वेने आंब्याच्या वाहतुकीसाठी सोडलेल्या दोन विशेष पार्सल गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी ओखा ते तिरुवनंतपुरम आणि परत या मार्गावर आणखी एक विशेष पार्सल गाडी सोडण्यात आली आहे. ही गाडी ५ मे दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी ओखा येथून रवाना होवून ती गाडी ६ मे सकाळी वसई, पनवेल, रोहा येथे थांबून ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरीत, दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी कणकवली, तर सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांनी मडगाव येथे थांबून तिरुवनन्तपुरमला रवाना होईल. ती गुरुवार. ७ मे तिरुवनंतपुरमला पोहोचेल. त्याच रात्री ११ वाजता ती परतीच्या प्रवासाला निघेल. शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर रात्री ११ वाजून १० मिनिटांनी ती रत्नागिरीत पोहोचेल. शनिवारी (दि. ९ मे) रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी ती ओखा येथे पोहोचल्यानंतर या गाडीचा प्रवास संपेल. या गाडीचा लाभ कोकणातील आंबा व्यावसायिकांनी घ्यावा आणि आपला आंबा मुंबईसह गुजरातमध्ये पाठवावा, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
