रत्नागिरी : शासनाने मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. ज्यावेळी शासन हा निर्णय घेईल, त्यावेळी जिल्हा प्रशासन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी आणेल. सध्या त्यांच्याबद्दल कुठलाही निर्णय झाला नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगिलते की, जे मजूर किंवा व्यक्ती परराज्यातील आहेत, त्यांना पाठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच जे जिल्ह्याबाहेर अडकलेले आहेत, त्यांना रत्नागिरीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मुंबई व पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने तिथल्या लोकांना रत्नागिरीत आणण्याचा सध्या कुठलाही विचार नाही.
