रत्नागिरी जिल्ह्यात १०० अंगणवाड्या बनल्या स्मार्ट

0

रत्नागिरी : विविध रंगांमधील बोलक्या भिंती, अंतर्गत भिंतींवर केलेली सजावट आणि मोठ्या अक्षरातील अंक, पाण्यापासून ते आसनव्यवस्थेपर्यंतच्या दर्जेदार सुविधा, बैठ्या खेळाचे विविध साहित्य असा साज असलेल्या शंभर स्मार्ट अंगणवाड्या जिल्ह्यात तयार झाल्या आहेत.

त्याचा फायदा अंगणवाडीतील बालदोस्तांना होत असून भिंतींवरील चित्रांमुळे अंक, अक्षरांची ओळख होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यात १०० अंगणवाड्या स्मार्ट झाल्या असून आणि शंभर अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी १ कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

जिल्ह्यात नव्याने बांधण्यात येणार्या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. नवीन अंगणवाड्यांना ‘बाला’ या संकल्पनेतून स्मार्ट करण्यात येत आहे. त्यात अंगणवाडी केंद्राला थ्रीडी पेंटिंग केले जात आहे. हॉल, किचनसह अन्य सुविधा दिल्या जात आहेत. अंगणवाडी केंद्रामध्ये लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी फळे, फुले, कार्टून, प्राणी, शैक्षणिक तक्ते तसेच आतून आणि बाहेरून थ्रीडी पेंटिंग केली आहेत. हॉलमध्ये चारही बाजूंनी काळा रंग देऊन भिंतीलाच फळ्याचे रूप दिले जाईल. टीव्ही, वजनकाटा चार्जिंग पॉइंट काढण्याच्या सूचना आहेत. अंगणवाडी केंद्राबाहेर ग्राऊंडवर सी-सॉ, घोडा-हत्ती, घसरगुंडी हे साहित्य ठेवले आहे. बालकांना शब्दांपेक्षा चित्रांची भाषा अधिक चांगली कळते. या अनुषंगाने बिल्डिंग अॅज लर्निंग एड म्हणजेच ‘बाला’ ही संकल्पना विकसित करण्यात आलेली आहे.

या अंतर्गत अंगणवाडी परिसरात चित्रांच्या माध्यमातून विविध बाबी आकर्षक पद्धतीने रेखाटण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर लावण्यात येत आहेत. बालकांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी स्वच्छतेचे साहित्य पुरवले जाणार आहे. अंगणवाडी केंद्राबाहेर कुंड्यांमध्ये फुलांची झाडे, छोटी रोपटे लावण्याच्या सूचना आहेत.जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत गेल्या दोन वर्षांत शंभर अंगणवाड्या स्मार्ट बनविण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 29/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here