चिपळूण : येथील अपरान्त रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेद्वारे उपचार घेता येण्याची सुविधा सुरु झाली आहे. गोरगरीब जनतेसाठी आरोग्य संजीवनी ठरलेल्या या योजनांद्वारे विविध आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया व उपचार, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा विकार यांच्या शस्त्रक्रिया व उपचार या सारख्या विविध गोष्टींवरील उपचार मोफत घेणे शक्य होणार आहे. पिवळे व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना पूर्णतः संगणकीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळे आणि केशरी) तसेच फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार पुरवता येऊ शकतात. महात्मा ज्योतीबा फुले व प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास प्रतीवर्ष दीड लाखापर्यंत विमा संरक्षण आहे. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किवा अनेक व्यक्तीना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनांमुळे आपत्कालीन आरोग्य परिस्थितीमध्ये मुंबई, पुणे किंवा मोठ्या महानगरांकडे न जाता तेच उपचार आपल्या शहरातच घेण्याचा सोयीचा पर्याय आर्थिकदृष्ट्या कोकणातील आर्थिक दृष्टीने दुर्बल जनतेसाठी उपलब्ध झाला आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. यतीन जाधव यांनी केले आहे.
