रत्नागिरी : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली. त्यासोबतच वीजबिलांची छपाई आणि वितरणही बंद केले. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रीडिंग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांनी सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ आणि ‘महावितरण’ मोबाइल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवून स्वतः रीडिंग घेण्याची सोय उपलब्ध करून दिली. या रीडिंगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी वीजग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. महावितरणच्या कंपनीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन करोना लॉकडाऊनच्या काळात संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्यात स्वतःहून मीटर रीडिंग पाठविणाऱ्या कोकणातील साडेआठ हजार ग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार महावितरणने वीजबिल पाठविले आहे. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाइलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील ३ लाख ६३ हजार वीजग्राहकांनी रीडिंग पाठविले. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोकण विभागातीला आठ हजार ५४२ ग्राहकांचा समावेश आहे. पुणे परिमंडलातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील ५८ हजार २१० वीजग्राहकांनी रीडिंग पाठविले होते. त्यांना महावितरणने रीडिंगनुसार बिल पाठविले आहे. महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीतजास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून प्रत्यक्ष रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाइल अॅप आणि संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत मीटर रीडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:13 PM 05-May-20
