मंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना: मंत्री उदय सामंत म्हणाले…

0

मुंबई : महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांवरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून रणकंदन सुरुच असतानाच आता पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लोढा यांनी एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारची तुलना औरंगजेबाशी केली आहे.

आज 363 वा शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिंदे व्यासपीठावर मंगलप्रभात लोढा यांनी बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी बाहेर पडले.

मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दुसरीकडे त्याचा वेगळा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

वेगळा अर्थ काढू नये

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लोढा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मंगल प्रभात लोढांनी जे उदाहरण दिले त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नये. शिंदे हे दबावाखाली होते, कडेकोट बंदोबस्तात होते. त्यातून सुटका त्यांनी केली. म्हणजेच ज्या पद्धतीने मुघलांच्या ताब्यातून महाराजांनी सुटका केली, त्याच पद्धतीने शिंदेंनी सुटका केली. त्याचा वेगळा अर्थ काढू नये

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 30/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here