कोरोना महामारीनेअवघ्या जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले असतानाच आता आणखी एका महामारीची भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे.
रशियातील एका तलावाखाली असलेल्या 48,500 वर्षे जुन्या ‘झोम्बी व्हायरस’ला पुन्हा जिवंत केल्याचा दावा फ्रेंच शास्त्रज्ञांनी केला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या मते, हा व्हायरस पुन्हा जिवंत झाल्यानंतर आणखी एका साथीच्या रोगाची भीती आहे. असं फ्रेंच शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवी जीवनाला मोठा धोका
शास्त्रज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवी जीवनावर मोठा धोका निर्माण झाला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे हवामानातील बदलामुळे बर्फातील पर्माफ्रॉस्ट झपाट्याने वितळत आहेत. यामुळे अनेक जुने विषाणू पुन्हा जिवंत झाल्याचा दावा केला जात आहे. रशियातील एका तलावाखाली 48,500 वर्षांहून अधिक काळ बर्फात गोठलेला झोम्बी व्हायरसही आता जिवंत झाल्याचा दावा केला जात आहे. हा विषाणू मानवांसाठी नवीन धोका निर्माण करू शकतो. न्यू यॉर्क पोस्टने व्हायरस अभ्यासाचा हवाला दिला, ज्यामध्ये असे म्हटलंय की, या प्राचीन विषाणूंचे अस्तित्व वनस्पती, प्राणी तसेच मानवी रोगांच्या बाबतीत अधिक धोकादायक असेल.
बर्फ वितळल्याने व्हायरस होतील जिवंत
प्राथमिक अहवालानुसार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर गोलार्धाचा एक चतुर्थांश गोठलेली जमीन वितळत आहे. यामुळे लाखो वर्षांपासून त्याखालील गोठलेले सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात, माहितीनुसार त्याखाली अनेक घातक सूक्ष्मजंतू असतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, वितळणाऱ्या बर्फाच्या या सेंद्रिय पदार्थाच्या भागामध्ये लपलेले सूक्ष्मजंतू तसेच वर्षानुवर्षे जिवंत असलेले विषाणू यांचा धोका सर्वाधिक असतो.
48,500 वर्षे जुना व्हायरस
युरोपियन संशोधकांनी रशियाच्या सायबेरिया प्रदेशात आढळलेल्या प्राचीन नमुन्यांची तपासणी केली आहे. त्यांनी 13 नवीन सूक्ष्मजंतू शोधून काढले आहेत. शास्त्रज्ञांनी याला ‘झोम्बी व्हायरस’ असे नाव दिले असून अनेक हजार वर्षे बर्फाळ जमिनीत राहूनही ते संसर्गजन्य राहिले असल्याचे आढळले आहे. सर्वात जुना विषाणू, Pandoravirus yedoma, 48,500 वर्षे जुना होता, मात्र तो पुन्हा जिवंत झाला असून भविष्यातील महामारीला कारणीभूत ठरू शकतो. याआधी सापडलेला सर्वात जुना विषाणू 30,000 वर्षे जुना आहे. सायबेरियातील शास्त्रज्ञांनी 2013 मध्ये याचा शोध लावला होता.
मानव आणि प्राणी संक्रमित होऊ शकतात
रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या संशोधकांच्या टीमने सांगितले की, शास्त्रज्ञांनी मान्य केले की हे विषाणू अतिशय धोकादायक आहेत. ते मानव आणि प्राण्यांना संक्रमित करू शकतात.
