रत्नागिरी : दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने आता कोकण किनारपट्टी भागात गेला आठवडाभर असलेले मळभ सरले आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत कोकणात थंडीचा मुक्कामही वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गुरुवारपासून तापमानात उतार कमी झाला असून, हलक्या गारव्याची चाहूल लागली आहे. गुरुवारी सकाळी रत्नागिरीत २७ अंश सेल्सियस तापामानाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत यामध्ये दोन ते तीन अंशांचा उतार झाला आहे.
हवामान विभागाने कोकण किनारपट्टी भागातील येत्या दोन ते तीन दिवसांचा अंदाज घेताना गुरुवारपासून धडकलेल्या पश्चिमी चक्रावाताच्या प्रवासाचा दाखला दिला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात थंड वारे प्रवाहित होण्यास अनुकूल वातावरण आहे. परिणामी गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकणातील जिल्ह्यांत असलेले ढगाळ वातावरण कमी झाले असून, पुन्हा हळूहळू थंडीचा प्रभाव वाढण्यास मदत होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे ही स्थिती तयार झाली होती. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांत किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी घट कायम होती. मात्र, दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. परिणामी सर्वच भागात गुरूवारपासून थंडी वाढू लागल्याला हवामान विभागाने हवामान अंदाजाद्वारे दुजोरा दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 02/Dec/2022
